- aditi tatkare list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ११ लाख नऊ हजार ४८७ महिला लाभार्थी आहेत. त्यापैकी ७१ हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहने असल्याची यादी राज्य स्तरावरून प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता त्या प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करीत आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यातील विभागाच्या आदेशानुसार पडताळणी होईल.
राज्यातील दोन कोटी ५९ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाखांहून अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यातील संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची नावे वगळली जात आहेत. त्यांना आता शासनाच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभमिळणार आहे. याशिवाय आता चारचाकी ज्या महिला लाभार्थी किंवा कुटुंबाकडे आहे, अशांचीही नावे अपात्र ठरविली जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात एकाच कुटुंबातील किती महिला लाभ घेतात, अशा सर्व निकषांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दोन लाखांपर्यंत महिला अपात्र होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
अपात्र ठरणाऱ्या महिलांना सध्या स्वतःहून यापूर्वी घेतलेल्या लाभाची रक्कम परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, आगामी काळात सर्व अपात्र लाडक्या बहिणींना पुढील कारवाई टाळण्यासाठी योजनेच्या लाभाची संपूर्ण रक्कम परत करावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष देखील तयार केले आहे. दरम्यान, सध्या सोलापूर जिल्ह्यातील ४९ महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला असून तसे लिखित अर्ज अधिकाऱ्यांकडे दिले आहेत.
जिल्ह्यातील लाडक्या बहिणी
• एकूण लाभार्थी
११,०९,४८७
दरमहा लाभ
• १६६.४२ कोटी
चारचाकीधारक महिला
७१,०००
लाभ नाकारणाऱ्या महिला
४९