Lek Ladaki Yojana 2025 Application

ऑनलाईन अर्जाची नोंदणी

योजनेचा लाभ देण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करता येऊ शकेल. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तर नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांच्याकडून लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, तपासणे, पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही होणार आहे. ग्रामीण भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) तर शहरी भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे हे सर्व अर्ज मान्यतेसाठी सादर करतील.

अर्जावर अंतिम मंजूरी हे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) हे व मुंबई आणि मुंबई उपनगराबाबतीत नोडल अधिकारी यांना आहेत. ते यादीस मान्यता देतील व मंजूर यादी आयुक्त, महिला व बालविकास यांना सादर करतील.

राज्यस्तरावर महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती तर महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. लाभाचे हस्तांतरण थेट डीबीटी प्रक्रियेद्वारे होईल. हे खाते लाभार्थी मुलगी व आईच्या नावे असे संयुक्त असेल. अर्ज सादर करतांना मातेचा मृत्यू झालेला असल्यास मातेच्या मृत्यू प्रमाणपत्र जोडून मुलगी आणि वडील यांच्या संयुक्त नावे खाते उघडता येईल.

लाभार्थी स्थलांतर झाल्यास

एखादे लाभार्थी कुटुंब योजनेतील एक अथवा काही टप्प्यातील लाभ घेतल्यानंतर राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकाऱ्याकडे त्यांनी अर्ज सादर करावा. याचप्रमाणे एखादे कुटुंब दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाले असेल आणि त्यांनी योजनेतील एक किंवा काही टप्प्यातील लाभ घेतले असतील तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल?

या योजनेतील आवश्यक सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त- महिला व बालविकास कार्यालयात उपलब्ध होतील. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा व तो अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे भराल?

योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्याची नोंद संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी. त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जांची छाननी केल्यानंतर काही कागदपत्रे कमी असल्यास किंवा एखादा अर्ज पूर्ण भरलेला नसल्यास १५ दिवसांच्या आत अर्जदाराला तसे कळवून १ महिन्याच्या आत त्याची पूर्तता करून घ्यावी. अपरिहार्य कारणास्तव विहित मुदतीत अर्ज न आल्यास वाढीव १० दिवसांची मुदत मिळू शकेल. अशाप्रकारे कमाल २ महिन्यांच्या आत अर्जावरची कार्यवाही पूर्ण होईल.